तुम्हाला देखील विसरण्याची सवय आहे का…स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

तुम्हाला देखील विसरण्याची सवय आहे का…स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

कधी कधी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं नाव काही केल्या आठवत नाही… तर कधीकधी एखादी गरजेची गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे हेच आठवत नाही…असं तुमचंही होतं का ?  अनेकदा स्वयंपाक घरात एखादा पदार्थ गॅस शेगडीवर शिजण्यासाठी ठेवल्यावर तो पदार्थ करपला तरी त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही ?

तर कधी कधी एखादी मौल्यवान गोष्ट ऐनवेळी कुठे ठेवली आहे हेच लक्षात येत नाही ? याचाच अर्थ तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय लागत आहे. खरंतर असं असेल तर मुळीच घाबरू नका कारण हे अगदी नॉर्मल आहे. वाढत्या वयाबरोबर माणसाची स्मरणशक्ती हळूहळू कमजोर  होऊ लागते. तसंच तुमच्याप्रमाणेच आजकाल अनेकांना ही समस्या भेडसावत आहे.|

स्मरणशक्ती कमी का  होते?

माणसाचा मेंदू ही निसर्गाने निर्माण केलेली अदभूत गोष्ट आहे. मेंदूचे योग्य पोषण न झाल्यास स्मरणशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा मेंदूवर अती-ताण येतो आणि हेच स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होण्याचे प्रमुख कारण आहे. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा वापर गरजेपेक्षा अधिक केला जात आहे.

ज्यामुळे माणसं मानवी मेंदूचा कमी वापर करतात. बऱ्याच गोष्टी गॅझेट्समध्ये सेव्ह केलेल्या असल्यामुळे मेंदूचा वापर हळूहळू कमी होऊ लागला आहे. सहाजिकच यामुळे मेंदूला गोष्टी स्मरण करण्याची गरज पडत नाही. मेंदूचे महत्त्वाचे काम ‘लक्षात ठेवणे’ अर्थात ‘स्मरणात ठेवणे’ हे आहे.

मात्र गॅझेट्सच्या अतीवापरामुळे मेंदूचा वापर कमी केला जातो. ज्यामुळे हळूहळू मेंंदू लक्षात ठेवण्यामध्ये अक्षम होऊ लागतो. आजकालच्या आधुनिक युगात मोबाईल अथवा कंप्युटरशिवाय राहणं केवळ अशक्य आहे.
मात्र या गॅझेटचा वापर आपण गरजेपुरताच केला तर भविष्यात अनेक समस्या कमी होऊ शकतात. जसं की रात्री झोपण्यापूर्वी एक तास कोणतेही गॅझेटस जवळ बाळगू नका.

ज्यामुळे तुमच्या मेंदूला झोपण्याचा सिग्नल मिळेल आणि तुम्ही वेळेवर झोपू शकाल. शिवाय जेवताना, नास्ता करताना कटाक्षाने मोबाईल दूर ठेवा. थकुन भागून घरी गेल्यावर मोबाईलवर वेळ घालविण्यापेक्षा आपल्या कुटूंबाला वेळ द्या. दिवसभर घडलेल्या गोष्टी त्यांना सांगा ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील.

विसरण्याची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात का जाणवते ?

महिला पुरूषांच्या तुलनेत एकाच वेळी विविध प्रकारची कामे करतात. महिलांना  एकाच वेळी घर, ऑफिस, शॉपिंग, मुलांचे संगोपन, मुलांचा अभ्यास, नातेवाईक, घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

ज्यामुळे त्याच्या मेंदूला एकाच वेळी अनेक गोष्टींवर फोकस करावा लागतो. असं केल्यामुळे महिलांच्या मेंदूचे संतुलन बिघडते. या गोष्टींचा आणि कामाच्या अती भाराचा ताण आल्याने त्यांना गोष्टी विसरण्याची सवय लागते. यावर सोपा उपाय म्हणजे घर, ऑफिस अथवा समाजातील आपल्या जबाबदाऱ्या सर्वांसोबत वाटून घ्या. घरातील जबाबदाऱ्या नवरा, मुलं यांच्यासोबत शेअर करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा अतीताण येणार नाही.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे पुरेसं लक्ष द्या. तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो अशा गोष्टी करण्याला प्राधान्य द्या. सुटीच्या दिवशी एखादा आवडीचा चित्रपट पहा अथवा एखादं आवडीचं पुस्तक वाचा.

ज्यात तुमचं मन रमेल आणि तुम्ही ताणापासून दूर रहाल. तसंच काळजी न करता विसरण्याच्या समस्येवर उपचार करा. तुम्ही जर वारंवार तुमच्या दैनंदिन गोष्टी विसरत असाल तर तुम्हाला आता एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा हे उपाय
रोज सकाळी मोकळ्या हवेवर फिरायला जा. ज्यामुळे तुमच्या मेंदूला शुद्ध हवेचा पुरवठा होईल शिवाय मेंदूला होणारा रक्तप्रवाहही सुरळीत सुरू राहील. मेंदूचे पोषण झाल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल.

स्मरणशक्ती वाढविणारी कोडी खेळा ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल.अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष घालू नका ज्यामुळे तुमचे मन नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहणार नाही.

नियमित मेडीटेशन आणि योगासनांचा सराव करा ज्यामुळे तुमचे मन आणि शरीर निरोगी राहील. दररोज काहीतरी नवीन गोष्ट शिका ज्यामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहील.

ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कमी बोला आणि गॉसिप करणं टाळा ज्यामुळे तुम्ही त्यावेळेचा एखादं चांगलं काम करण्यासाठी उपयोग करू शकता.

आठवड्यातून एकदा एखाद्या चांगल्या पुस्तकाचं वाचन करा आणि त्याविषयी तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीशी चर्चा करा ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल. एखादं टास्क वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती बळकट होईल.

मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ चिंतनासाठी देता येईल.दररोज पुरेसे पाणी प्या ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील कारण डिहायड्रेशनमुळे मेंदूचे योग्य पोषण होत नाही.

आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेष करा. रात्री चार ते पाच बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते दूधासोबत घ्या ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल.

दररोज दहा ग्रॅम अक्रोड खा कारण अक्रोड मेंदूसाठी एक उत्तम टॉनिक आहे. रात्री झोपताना हळद घातलेले दूध प्या ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारेल

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *